Monday, May 3, 2010

आता मी पण सर्पमित्र




तसं साप म्हटलं की भल्याभल्यांची टरकते..  मी-मी म्हणणारे पण साप दिसल्यावर पळ काढताना बघीतलेत मी...ह्याला पोलीस मामा पण अपवाद नाहि हां.. मग मी तरी कसा असेन? मला तर ’बाथरूम’ मधे साधी पाल जरी दिसली तरी ’आई आठवते’... सापाची तर गोष्टच सोडा, जाम फाटते. मागची ’पोस्ट’ वाचुन झालेल्यांना नक्कीच प्रश्न पडला असणार- आयला पालीला घाबरणारा हा असा कसला भुरट्या सर्पमित्र?? तीच् तर खरी गंमत आहे.. वाचा पुढे, मग तुम्हीही लगेच माझ्या सारखेच सर्पमित्र व्हाल.


तशी इतर सर्वांप्रमाणे मलाही लहानपणापासुनंच सापांबद्दल व्यवस्थित भीती घालण्यात आली होती, त्याला समाजातल्या आदरणीय घटकांकडुन खतपाणी घालण्याचं कामंही अगदी चोखपणे बजावण्यात आलं. साप दिसल्यावर कश्या प्रकारे कुठलीही गोष्ट साप मारण्याचे हत्यार होवु शकते ह्याचे जणु नित्यं नेमानं प्रात्याक्षिकंच व्हायचे. हॉकी स्टीक, स्टंप-बॅट ह्यांचा शोध जणु खेळण्यासाठी नव्हे तर सापांना मरण्यासाठीच झाला असावा.. गावाकडं तर ही साप मारण्याची अघोषीत हत्यारंच आहेत. शाळेत तर कीती तरी साप असे धारातिर्थी होताना बघीतलेत मी. लहानपणी कॉलनीत एकदा क्रिकेट खेळताना खेळता खेळता गवतात गेलेला टेनीस बॉल आणायला गेलो, योगायोगाने तो एका हिरव्या सापाच्या बाजुला जाऊन पडला होता.. सापही बॉलच्या ध(स)क्याने ’तयारीत’च बसला होता.. मी तर त्याला अगदी बॉल समजुन ऊचललंच होतं.. पण ऐन वेळी लक्षात आलं आणी बोंबा मारत बाहेर आलो. त्यावेळेस आमच्यातल्यांच एका ’हिरो’ ने क्रिकेटच्या बॅटनी त्याचा कित्ता गिरवला होता.. आख्खी कॉलनी ’शो’ बघायला जमली होती. आता कळतं की तो गवत्या होता, एक बिनविषारी साप. खूप वाईट वाटतं आठवलं की... बिचारयाला माझ्या मुळे जीव गमववा लगला.. पण असे कितीतरी साप रोज जगण्याच्या लढाईत शहीद होत असतील नाही?


पण जेव्हा पासून डिस्कवरी, नॅशनल जियोग्रॅफिक आणि अनिमल प्लॅनेटसारख्या ’चॅनल्स्’ ने घरघरात झेंडे रोवले, तेव्हापासून कळत-नकळत लोकांच्या मनातल्या सापांबद्दलच्या असलेल्या भीतीचा कुतुहलाने कधी पराभव केला ते कळलेच नाही. मी तर एकही कार्यक्रम चुकवायचो नाही, आजही शक्य असेल तेव्हा आवर्जून बघतोच, तुमचं ही थोड्या फार फरकाने असंच होत असेल, असो.
सांगायचा मुद्दा हा की ह्या टि.व्ही. मुळे तर ह्या ’इंट्रेस्टींग’ प्राण्याबद्दलची उत्सुकता ’इंट्रेस्टींगली’ वाढली. आपल्यालाही ’स्नेक रेस्क्यु’ करता यायला पाहिजे असं मनोमन जसं सगळ्यांनच वाटतं अगदी तस्संच मालाही वाटायचं, पण ते वाटतं तेवढं सोपं काम नाहीए ह्याची कल्पना होतीच. ’फोटोग्रफी’ सुरू केल्या पासून तर हया इच्छेने अजुनच जोर धरला होता.. ऑस्टीन स्टिव्हन्स् चे प्रोग्रॅम्स् बघुन तर रक्त अजुनंच सळसळायचं, पण सगळी भुक टि.व्ही. बघुन व सुस्कारे सोडुनच भागवायला लागायची, म्हणून मग मधुनंच कुठेतरी काही सापांबद्दल काही ’फॉर्मल ट्रेनिंग’ वगैरे आहे का ह्याचा शोध घेत असायचो, त्यासाठीच मागच्या वर्षी एकदा जंक्या बरोबर कात्रज स्नेक पार्कला चक्कर पण मारली, पण तिथुन कळलं की सरकारने गेल्या वर्षीच असले ’ट्रेनिंग्स्’ बंद केलेत. शेवटी तसंच १-२ सापांचे फोटो काढून परतलो होतो.



पण ते तुकोबांनी म्हणलंय ना "धीरापोटी फळे रसाळ गोमटी", ते अगदी खरं आहे. त्याचाच प्रत्यय असाच एका दिवशी अचानक सकाळी सकाळी ’सकाळ’ वाचताना आला. एका बातमीने चटकन माझ लक्ष वेधलं होतं- "आता सरपटणार्‍या प्राण्यांवर आभ्यासक्रम". तुमच्या पैकी नियमीत सकळ वाचणार्‍यांना ही बातमी कदाचित आठवत असेल. अरण्यवाक नावाच्या संस्थेने सरपटणार्‍या प्राण्यांवर जनरल अवेर्नेस आणि बेसिक नॉलेज म्हणून एक ८ दिवसांचा ’कोर्स’ आयोजीत केला होता- "क्रोक्स अँड हिसेस". 


माहिती वाचून तरी तो खरंच ’इंट्रेस्टिंग’ कोर्स वाटला, सापांबद्दल शिकायला मिळेल आणि २-४ लोकांशी ओळखीही वाढतील म्हणून लगेच दिलेला फोन नंबर फिरवला, व्यवस्थीत सगळी माहिती काढली, ’हर्पेटोलॉजी’ चा ’इन्ट्रोडक्टरी’ कोर्स होता, असं म्हणलं तरी चालेल. जंक्यला पण विचारलं, पठ्ठ्या एका पायावर तयारंच होता. हर्पेटोलॉजीवर अधारीत कोर्स असल्यामुळे त्यात सापा व्यतिरिक्त इतर सरपटणारे व उभयचर प्राणीही होते- बेडूक, पाली, सरडे, कासव, मगरी इत्यादी..आठ दिवसात सात लेक्चर्स आणि दोन ’आउटींग्स्’ होत्या, एक कात्रज स्नेक पार्क आणि दुसरे फील्ड व्हिजीट- ताम्हिणीचे खोरे. आम्हाला खरी उत्सुकता होती ती तिसर्‍या दिवसाची, कारण त्या दिवशी सापांवरचं ’लेक्चर’ द्यायला ज्येष्ठ सर्पतज्ञ्न व स्नेक टॅक्सॉनॉमिस्ट अशोक कॅप्टन येणार होते.
शेवटी लॉ कॉलेज रोड वर एका शाळेत वर्ग सुरू झाले. वाटलं होतं की बरेच लोकं असतील, पण पालीं, सरडें, बेडकं ह्या असल्या किळसवाण्या प्राण्यांविषयी जाणून घ्यायला कोण येणार, तेही पैसे देऊन? तरी पण २५-३० लोकांनी हजेरी लावली होती, त्यात बरेच 'इंट्रेस्टिंग' लोकंही होते, 'हार्पेटोलॉजीस्ट' व्हायचं स्वप्न बळगणारा दहावीतला चैतन्य ते पार वयाची चाळिशी ओलांडलेल्या व कदाचित महाराष्ट्रातल्या पहिल्याच सर्पमैत्रीण- जानकी काकू अश्या सगळ्याच वयोगटातील व्यक्ती भेटल्या. वाटलं होतं आय.टी. मधले पण बरेच लोकं असतील, पण अनपेक्षित पणे एकंच कार्टं होतं. पण अजिंक्य आणि मला विशेष आनंद ह्यासाठी झाला होता की तब्बल ९ वर्षानी आम्ही दोघं एकत्र वर्गात बसणार होतो, एकाच बाकावर.

पहिले दोन दिवस बेडुक व पाली सरड्यांवर गेले, गरवारेच्या झुलॉजी चे. प्रा. आनंद पाध्ये ह्यांनी बेडकांवर छान माहिती दिली, हा माणुस म्हणजे बेडूक स्पेशलिस्ट हां. त्यांचे बेडकांविषयीचे अनुभव व भन्नाट ’एक्सपरिमेंट्स’ त्यांच्याच तोंडून ऐकावे असे आहेत, माझ्या सारखा क्षुद्र माणूस तर विचार पण नाही करू शकत. त्यांचं लेक्चर व काम ऐकून तर समोरच्यालाच डबक्यातल्या बेडकावानी वाटायला लागतं, कुठे आपलं ते कंप्यूटरचं भवनाशून्य विश्व जिकडे आपण १२-१२ तास डोकं घालून बसतो आणी कुठे ह्या प्राण्यांचं आगळं वेगळं विश्व. उगाच आत्तापर्यंत बेडकांविषयी किळस वाटत होती असं वाटून गेलं. अजुन एक इन्ट्रेस्टींग गोष्ट कळली की बेडकं आपल्याला फक्त पावसाळ्यातच दिसतात, इतर वेळी ते जमिनीखाली दिर्घनिद्रेत(हैबरनेट) असतात, तेव्हा ते कुठे व कश्या अवस्थेत असतात ह्यावर अजुन आपल्याला बरीच माहिती नाहीए, त्यावर संशोधन करायलाही सहसा कुणी उत्सुक नसतं, टिव्ही वर पण कधीच बेडाकांना रेडियो टॅगिंग करताना बघितलेलं मला आठवत नाही. ह्या वरुनच कळतं की बेडूक हा प्राणी खरंच किती उपेक्षित आहे ते. पाली सरड्यांवरचा विषय गरवारेचेच प्रा. विवेक ब्रूम यांनी घेतला, पाली सरडयांबद्दलच्या असंख्य गोष्टी कळल्या त्या दिवशी, पाल ’वॅक्क्यूम’ करून भिंतीवर चालते हा सगळ्यात मोठा गैरसमज त्या दिवशी दूर झाला. एकंदरीत सुरवातीचे दोन दिवस अपेक्षेपेक्षा अगदी छान गेले होते, पाली सरडयांविषयी अनेक मजेशीर गोष्टी कळल्यामुळे अजिंक्य त्या दिवशी संध्याकाळीच मुद्दाम मला त्याच्या एका मैत्रिणिकडे घेउन गेला जी पालींना गालावर ठेवून फोटो काढते... किळस वाटते ना ऐकुन? सुरवतीला मला पण वाटली होती, पण घरातल्या पालींवर एवढे प्रेम करणारे लोकं पण आहेत हे कळल्यावर जरा गंमत वाटली. तरीही पालींबद्दलची मला वाटणारी किळस तसुभरही कमी नाही झाली, आजसुद्धा माझं घर मी एका पालींच्या जोडप्याबरोबर शेअर करतोय.. आज खरंतर त्यांच्यामुळेच आमच्या घरात माझ्या शिवाय एकही किडा ’वळवळ’ करताना दिसत नाही, असो.

शेवटी तो तिसरा दिवस उजाडला.. त्या दिवशी पार्किंग मध्ये गाडी लावतानाच समोर असलेल्या व्यक्तीला मी ओळखलं होतं, डोक्यावरचं अर्ध टक्कल, अतिशय काटक शरीर, बारीक मिश्या, निळी ट्रॅक पॅंट्स आणि शुभ्र पांढरा टी-शर्ट.. चार माणसात चांगलेच "ऊठून" दिसत होते अशोक कॅप्टन. त्यांचं लेक्चर तर एकदमच ’तोड्फोड’ झालं. सापांबदद्ल तर बरंच काही कळलंच पण आत्तापर्यंत आमच्यासाठी खुप कौतुकाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सर्पमित्रांबद्दल बर्‍याचश्या आतल्या गोष्टी कळल्या. टि.व्ही. वरच्या माझ्या आवडत्या प्रोग्रॅम्स् बद्दल पण थोडा दृष्टिकोन बदलला... ज्या लेक्चरची इतक्या उत्सुकतेने वाट पहात होतो त्या लेक्चर नंतर सर्पमित्रांबद्दलची माझी व्याख्याच बदलली. आजकालचे सर्पमित्रांची ’कन्सर्वेशन’ च्या नावाखाली एकमेकांशी चाललेली स्पर्धा ते टि.व्ही वर दाखवले जाणारे चित्त्तथरारक ’वाईल्डलाइफ अड्वेंचर्स’ असले आमच्या  बालमनावर भुरळ घालणरे,  नाजुक पण अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले विषय त्यांनी काहीही दयामाया न दाखवता एखाद्याने अर्धवट जळती सिगरेट फर्शीवर टाकून पायाखाली चिरडावी  तसे चिरडून टाकले. दोन दिवसा नंतर मग ह्याच पार्श्वभुमिवर सौरभ फडकेचं ’एथिक्स् इन कॉन्सेरवेशन’वर लेक्चर झालं. त्याने तर ते उरलेसुरले सिगरेट चे आवशेषही अलगद उचलून कचरयाचा पेटीत टाकून दिले.

’वाइल्डलाइफ’ हा शब्द सध्या ’हॉट डेस्टीनेशन’ झालाय,  पण त्यातले खरे ’कॉन्सर्वेशनीस्ट’ किती आणि हौशी किती ह्यावर विचार करण्याची आज खरंच वेळ आलेली आहे. एकदा का साप पकड्ण्याची ’टॅक्ट’ कळली की हौशी सर्पमित्रांचे नकळत सर्पशत्रुत रुपांतर होते. साप दिसला की लगेच त्याला पकडणे, भलेही त्याला तुमच्या मदतीची गरज असो नसो, पकडल्या नंतर मग तो ’मेल’ आहे का ’फ़िमेल’, त्याचे विषदंत (’फॅंग्स्’) कुठे आणि कसे आहेत हे असले उद्योग गरज नसतानाही उगाच आजुबाजुच्या ४ लोकांना ’इम्प्रेस’ करण्यासाठी केले जतात.


बर्‍याच वेळेस ’स्नेक रेस्क्यु’ तर बजुलाच राहते आणि हयांचे ’फोटोसेशन्स’च तास-तास भर चालतात, नंतर मग आहेच ’इंटरनेट’ आणि ’सोशल नेटवर्कस्’ पब्लिसिटी मिळवण्यासाठी. अर्थात, सगळेच सर्पमित्र तसे नाहीत, हे प्रकार नवीन नवीन साप पकडायला शिकलेले हौशी सर्पमित्रांकडुन जास्त घडतात, कारण असले धाडस करणे म्हणजे आजकाल बिनधास्तपणा आणि ’कुलनेस’ चे मापदंड ठरु लागले आहेत. काहीतरी हटके करण्याच्या प्रव्रुत्ती (का विक्रुती?) मुळे नकळत आपल्याला ज्याचं ’कन्सर्वेशन’ करायचंय त्यालाच अस्ल्या प्रकारांनी ते घातक ठरतय हा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवु नये?
काहि अनुभवी सर्पमित्र पण आभ्यसाच्या नावाखाली महिनोंमहिने साप पेटीत बंद करून ठेवतात. अगदी गेल्या वर्षीच कोथरुड पोलिसांनी एका सर्पमित्राकडे ४० जिवंत साप पकडले होते. 
हे तर काहीच नाही, बरेचसे हौशी सर्पमित्र तर एकीकडे पकडलेला साप इतरांना दाखवण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातात आणि ’हिरोगीरी’ करुन झाल्यावर तिसरीकडेच नेऊन सोडतात. असले प्रकार हल्ली खूप वाढले आहेत म्हणूनच म्रुतावस्थेतही ’आपबिती’ सांगणारे बरेचसे नॉन-महाराष्ट्रीयन सापं महाराष्ट्रात सापडतात. बिचार्‍या त्या प्राण्याचं काय होत असेल ह्याचा तर विचारंच न केलेला बरा.
हे झालं सर्पमित्रांबद्दल, टी.व्ही. वाले पण काही कमी नाहीयेत, ते जरी ’कन्सर्वेशन’ उत्तमरित्या करत असले तरी त्यांच्या अती हिरोगिरी चा त्रास नकळत ह्या मुकया प्राण्यांना सहन करावा लागतोय. मगरींवर उड्या मारुन त्यांचे तोंड बांधणारे काय आणि चांगल्या फोटोंसाठी सापांवर 'स्टंट' करणारे काय, त्यांचा उद्देश जरी कितीही चांगला असला तरी त्यांच्या ह्या अती ’कूलनेस’ मुळेच नकळत बर्‍याच लोकांना (एस्पेशली हौशी सर्पमित्रांना) असले उद्योग करण्याची प्रेरणा मिळते ज्याचा त्रास नकळत त्या प्राण्यांना होतो, हा इतका साधा व महत्वाचा मुद्दा त्यांना कसा कळत नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. ह्यावर रामबाण उपाय काढणे खरंच अवघड आहे, आज जरी असले प्रकार कमी प्रमाणात होत असले तरी भविष्यात ह्या गोष्टी वाढण्याला खुप वाव आहे. आपल्या हातात तर फक्तं ’अवेर्नेस’ वाढवणे एवढेच आहे. ’वाईल्डलाइफ फोटोग्राफी’ हा प्रकार पण त्यांच्यामुळेच (टि.व्ही) जास्त फॉर्मात आलय, आजकाल वाईल्डलाईफ मध्ये कहितरी करणे म्हणजे एक प्रकारचं ’स्टेटस सिंबल’ समजलं जातं. ह्यात एखाद्याला काडीचंही ज्ञान नसलं तरी ’वाईल्डलाइफ’ फोटोग्राफी करुन आपण कंजरवेशन करु हा गैरसमज/किडा बर्‍याच लोकांना असतो, कॉर्पोरेट पब्लिक मध्ये तर त्या किड्याने ’सुलेमानी’ किड्याचं रुप धारण केलेलं असतं. मग त्यांचं ते प्राणीप्रेम वीकेंडला (हो, फक्त वीकेंडलाच) भरभरुन वाहतं, आणि मग नंतर वीकडेज् आहेतंच 'सोशल नेटवर्कींव'र फोटो टाकुन टाकुन ’स्टेटस पणाला’ लावायला... अर्थात सगळेच तसे नसतात काही लोकं खरंच मनापासुन व प्राण्यांबद्दल असलेल्या अस्थेमुळे करतात, पण त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहे.

 गावकडे माझेही काही मित्र सर्पमित्र म्हणुन काम करतात, त्यांच्या बरोबर साप 'रेस्क्यु व रिलीज्' करायला मी पण बर्‍याच वेळेस जातो.  

सुदैवाने ते लोकं जरी असले विचित्र प्रकार करत नसले तरीपण त्यांच्या समाधानासाठी १-२ वेळेस नाइलाजाने त्यांचे तसले हातात साप घेऊन असलेले फोटो मी पण काढले आहेत (पण ते इकडे इंटरनेट वर कधीच टाकणार नाही). मी स्वत: जरी असले प्रकार कधी केले नसले तरी सापांबद्दल शिकुन व नंतर पकडुन त्यांचे फोटो काढण्याची सुप्त इच्छा तर माझी पण होती. पण हे 2 लेक्चर्स ऐकुन मलाच माझी लाज वाटायला लागली, मला खात्री आहे की क्लासमधील इतर बरयाचश्या लोकांची अवस्थाही माझ्यापेक्षा काही वेगळी नसेल. पण हे असले चाळे आपण कधीच करायचे नाहीत असे लगोलग मी आणि अजिंक्यने ठरवुन टाकले हे वेगळे सांगायची गरज नाही.
पण ह्याचा अर्थ फोटो काढायचेच नाहीत असा नाही हं, पण केवळ आपल्याला चांगला फोटॊ मिळावा म्हणुन मुक्या प्राण्यांना उगाच त्रास नाही द्यायचा, हाताळायचे तर बिलकुल नाही.
शेवटी मेहनत करून Natural Habitat मधे काढलेल्या फोटोंची मजा आणि त्यातून 'फोटोग्राफर'ला मिळालेलं समाधान ह्याची सर त्या हातात साप घेऊन काढलेल्या फोटोंना थोडीच येणार आहे?









ते म्हणतात ना, काही स्वप्नं लवकर संपतात पण कायमची झोप उडवतात... माझ्या सर्पमित्र व्ह्यायच्या स्वप्नाचे असेच काहीतरी झाले. आज समाजात सर्पमित्र असणे म्हणजे फ़क्त साप पकडणे आणि दुर जंगलात जाउन सोडणेअसा आहे, माझाही तोच गैरसमज होता, तो त्या २ दिवसांमध्ये मध्ये चांगलाच दुर् झाला. आजही रानावनांत भटकताना जर चुकुन साप दिसलाच तर त्याला न पकडता व त्रास न देता त्याच अवस्थेत सोडुन आपला रस्ता पकडणे हि पण त्या सापाला एका सच्च्या मित्रासारखी मदत केल्यासारखीच आहे... आणि आज ज्याला स्वत:वर संयम ठेऊन हे करणे जमेल तोच खरा सर्पमित्र.

जाता जाता अशोक कॅप्टनचं एक वाक्य सांगतो, बघा पटतंय का-

"Most of the people we see on T.V catching snakes and jumping like monkeys over the crocodiles can't be real 'Sarpamitras'... they are just some kool n funny guys, they just want to look kool on TV, thats it. Now, its up to you what you want to be- A kool guy or a real Sarpmitra?"
 माझ्या मनाने तर लगेच कौल दिला होता, तो काय होता हे एव्हाना ह्या लेखाचं शिर्षक वाचुन तुम्हाला कळलं असेलच... मग होणार ना तुम्हीही माझ्या सारखे सर्पमित्र?

15 comments:

Jyoti said...

too gud as before...very nice keep it up..n waiting 4 ur next posts :)

Anonymous said...

मी पण आता खरा सर्पमित्र होनार आहे

महेंद्र on May 3, 2010 at 9:27 PM said...

Wow!! Great post..

हेरंब on May 4, 2010 at 12:59 AM said...

अप्रतिम.. फोटोज तर एकसे एक आहेत !!!

Pritam on May 4, 2010 at 3:41 PM said...

@Jyoti... :) wouldn't have been possible without you.. thanks!!!

Pritam on May 4, 2010 at 3:41 PM said...

@छावा वेलकम टू द क्लब.. :)
@महेन्द्र, हेरंब, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, अशीच भेट देत राहा...!!

Nirmala Mane said...

Pritam too good like last one.Keep it up.Waiting for the next.

Pritam on July 13, 2010 at 12:52 PM said...

घान्यवाद निर्मला मॅडम.. :) माहीत नव्हतं तुम्ही पण मझा ब्लॉग वाचत असाल म्हणून... अशीच भेट देत राहा...

Meenal Gadre. on August 3, 2010 at 9:35 PM said...

मग होणार ना तुम्हीही माझ्या सारखे सर्पमित्र?
हे मला विचारशील तर माझं उत्तर असेल ---अशक्य!!!

Pritam on August 4, 2010 at 12:08 PM said...

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.... पण अशक्य का ?

Meenal Gadre. on August 5, 2010 at 2:21 AM said...

अशक्य! आपली बुवा फार घाबरगुंडी उडते.
माझ्या ब्लॉग वरचा ‘अजगर ‘ लेख वाच.
अजून काही उत्तर मिळतील.

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Pankaj - भटकंती Unlimited on January 24, 2011 at 2:33 PM said...

ब्लॉग बंद का पडला?
वेळ मिळत नाही हे नेहमीचे उत्तर सोडून बोल.

Pritam on January 24, 2011 at 2:41 PM said...

अरे वेळेचा प्रश्न नक्कीच नाहीये, पर्सनल लाइफ मध्ये बर्‍याच घडामोडी झाल्या मध्यंतरी... पण बर झाल आता तू चिमटा काढलास... आता पुन्हा सुरवात करतो लिहायला...

Unknown on May 18, 2011 at 11:58 AM said...

he pritam i had visited webpage its quit intresting yar
supper like....

ये रे मझ्या मागल्या

 

प्रितमभावसार.कॉम. Copyright 2009 All Rights Reserved